जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
भारतीय रेल्वेच्या ६९ विभागांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे विभागाने वक्तशीरपणाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १३ मार्च रोजी विभागाने तब्बल १७३ मेल व एक्स्प्रेस गाड्या शंभर टक्के वेळेत चालवून हा विक्रम नोंदविला.मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या भुसावळ विभागाने गाड्यांच्या वेळपालनात सातत्यपूर्ण सुधारणा करत हा मान मिळविला आहे.
अधिकृत माहितीनुसार, त्या दिवशी विभागासाठी ५४,०६७ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे नियोजन करण्यात आले होते, तर एकूण ५४ हजारांहून अधिक मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला होता. ‘इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टम’मध्ये नोंद झालेल्या सर्व १७३ गाड्या नियोजित वेळेत धावल्याने विभागाने १०० टक्के वक्तशीरपणाचा टप्पा गाठला.ही कामगिरी इतर विभागांच्या तुलनेत लक्षणीय ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोधपूर विभागाच्या तुलनेत भुसावळ विभागाने हाताळलेल्या गाड्यांची संख्या अधिक असून, हुबळी, राजकोट आणि भावनगर या विभागांच्या एकत्रित आकड्यापेक्षाही भुसावळ विभाग पुढे राहिला आहे.
दोन दिवसांत विक्रमात सुधारणा.
भुसावळ विभागाने ११ मार्च रोजी ९८.३२ टक्के वक्तशीरपणाची नोंद केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही कामगिरी शंभर टक्क्यांवर नेण्यात यश आले. विभागाच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम नोंदविला गेला असून, हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, भुसावळ विभागाच्या या उत्कृष्ट कामगिरीचा सकारात्मक परिणाम मध्य रेल्वेच्या एकूण कामगिरीवरही झाला आहे. देशातील १७ क्षेत्रीय रेल्वे विभागांमध्ये मध्य रेल्वेला पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यास मदत झाली असून, मार्च महिन्यात ३, ५, ११ आणि १३ मार्च रोजी १०० टक्के वक्तशीरपणाची नोंद करण्यात आली आहे.

