तळागाळातील नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा; संघटन मजबुतीसाठी सक्षम चेहऱ्याची गरज!
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे नाव ठळकपणे पुढे येत असून, विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. विविध स्तरांवरील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीसाठी एकमुखी मागणी होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून घडलेले पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर कार्य करताना ठसा उमटवला आहे. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच नगरसेवक आणि गटनेते म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळताना विकासाभिमुख भूमिका घेतली. लोकांच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेणे आणि निर्णयक्षम कार्यपद्धती ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात.भाजप संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवत कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू असून पक्षाला अधिक सक्षम बनवण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, नशिराबादचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोढरे यांनीही पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व विधान परिषदेवर जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या भूमिकेला विविध स्तरांतून तसेच जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत असून, वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे.एकूणच, लालचंद पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आणि संघटन अधिक मजबूत होईल, अशी भावना सध्या जळगाव जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

