नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील महालक्ष्मी चौफुलीवर अपघातांचे सत्र अद्यापही थांबलेले नसून, आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव ही गंभीर समस्या ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, आजतागायत येथे ना गतिरोधक बसविण्यात आले आहेत, ना पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. परिणामी, या चौफुलीवर दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या तसेच नशिराबाद-भादली मार्गावरील ही चौफुली अत्यंत वर्दळीची आहे. रात्रीच्या वेळी येथे प्रचंड अंधार असतो. महामार्गावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना चौफुलीचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांची दिशा स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो.दरम्यान, नशिराबाद नगरपरिषदेकडून काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, खासदार, पालकमंत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन देऊन या ठिकाणी हायमस्ट दिवे व गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्या निवेदनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
विशेष म्हणजे, शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चौफुलीवरील समस्येची तातडीने दखल घेऊन प्रकाशव्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.सतत वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.महालक्ष्मी चौफुलीवर त्वरित हायमस्ट दिवे बसवून, गतिरोधक उभारून सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.

