नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कामगार, नोकरदार वर्ग, तसेच वृद्ध, महिला व रुग्ण प्रवासासाठी एस.टी. बससेवेवर अवलंबून असतात. मात्र, येथील बससेवा दिवसेंदिवस अधिकच धोकादायक होत असून, बस चालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.गावात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे अनेक बस गावात न येता बायपास मार्गाने धावतात. काही बस चालक तर नियम धाब्यावर बसवत थेट महामार्गावरूनच बस चालवतात. परिणामी, नशिराबाद येथे अधिकृत थांबा असूनही अनेक बस थांबत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जळगाव व भुसावळ येथून येणाऱ्या प्रवाशांना “नशिराबाद येथे थांबा नाही” असे सांगून बसमधून उतरविण्याचे प्रकारही घडत आहेत.याशिवाय, काही बस चालक प्रवाशांना अधिकृत बसस्थानकाऐवजी थेट महामार्गावरच उतरवतात. त्या ठिकाणी बायपास मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांना जीव धोक्यात घालून बॅरिकेट्स ओलांडावे लागतात. महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे येथे गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अशाच स्वरूपाचे अपघात घडूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.विशेषत: वृद्ध नागरिक, महिला व रुग्णांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा स्थानिकांनी प्रशासनाकडे निवेदने देऊन तसेच आंदोलने करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. काही काळासाठी उपाय म्हणून बस प्रशासनाने बायपास मार्गावर कर्मचारी नेमले होते; मात्र ही व्यवस्था तात्पुरतीच ठरली. अद्यापही अनेक बस थांब्यांवर न थांबता वेगाने पुढे निघून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्या वेळेवर पोहोचणे शक्य होत नसून याचा त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडत आहे.
एस.टी.बस चालकांच्या मनमानीमुळे जीवावर बेतनार ; महिलेचा एक वृद्धा व दोन मुलांसह हायवे वरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास
नशिराबाद येथे काल घडलेल्या एका घटनेत बसमधील प्रवाशाने संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून प्रसारमाध्यमांकडे पाठविले. या घटनेत जळगाव डेपोची बस नशिराबाद येथील उड्डाणपुलावर थांबविली गेली. त्या बसच्या काचेवर चुन्याने धुळे बऱ्हाणपूर लिहिले असल्याचे दिसून येतं आहे. त्या बस मधून दोन महिलांसह लहान मुलांना महामार्गावरच उतरविण्यात आले.बॅरिकेट्स ओलांडणे शक्य नसल्याने त्यांना सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागले. हातात सामान व एक वृद्धा आणि दोन लहान मुले घेऊन केलेला हा प्रवास अत्यंत कष्टदायक आणि जीवघेणा ठरला.नशिराबाद येथील प्रवाशांसाठी ही परिस्थिती आता नित्याची झाली असून, संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गंभीर अपघात घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

