Monday, June 1, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यप्रशासनाचा निष्काळजीपणा की नागरिकांच्या जीवाशी खेळ? सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात आठ दिवसांपासून मृत...

प्रशासनाचा निष्काळजीपणा की नागरिकांच्या जीवाशी खेळ? सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात आठ दिवसांपासून मृत बैल, तरीही पाणीपुरवठा सुरू..!

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक नमुना मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात समोर आला आहे. बोदवड रोडवरील या केंद्राच्या परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह पडून असल्याची माहिती समोर आली असून, तरीदेखील प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मृत बैल कुजलेल्या अवस्थेत पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. अशा गंभीर परिस्थितीतही संबंधित विभागाकडून कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे याच परिसरातून नागरिकांना पाणीपुरवठा होत असल्याने दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संतापाची लाट पसरली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या यंत्रणा आणि स्वच्छतेच्या दाव्यांवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांच्या जीविताशी संबंधित इतका गंभीर प्रकार घडत असताना प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जर दूषित पाण्यामुळे कोणतीही आरोग्यविषयक आपत्ती उद्भवली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, मृत जनावराची तात्काळ विल्हेवाट लावावी आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.”स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी असलेले प्रशासनच जर निष्काळजीपणा करत असेल, तर नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे?” असा संतप्त सवाल आता परिसरातून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या