तारापूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि साहित्यिक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिन्मय विद्यालय, तारापूर यांनी ब्रि बुक्सच्या सहकार्याने राबविलेल्या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून लेखनाची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचे पुस्तक साकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर कादंबरी किंवा लघुकथा लिहिण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला आणि लेखनकौशल्याला नवी दिशा देत विविध विषयांवर साहित्यनिर्मिती केली.
या उपक्रमातून विद्यार्थिनी कु. इशिका विजय पाटील हिने ‘द ट्रुथ दे बरीड’ हे रहस्यप्रधान पुस्तक लिहून साहित्यविश्वात उल्लेखनीय पाऊल टाकले आहे. ३९ पानांच्या या पुस्तकाची कथा चार चुलत भावंडांच्या साहसी आणि रहस्यमय प्रवासाभोवती गुंफण्यात आली आहे. सुट्टीसाठी एकत्र आलेल्या या मुलांना एका ओसाड आणि गूढ ठिकाणाविषयी कुतूहल निर्माण होते. त्या ठिकाणामागील इतिहास आणि दडलेले रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नातून कथानक पुढे सरकत जाते. शोधमोहीमेदरम्यान त्यांच्यासमोर येणाऱ्या घटनांमुळे वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते.इशिका हिला फॉर्म्युला वन रेसिंगची विशेष आवड असून त्या खेळातील नामांकित ड्रायव्हर्सकडून प्रेरणा घेत तिने पुस्तकातील प्रमुख पात्रांना त्यांची नावे दिली आहेत. त्यामुळे कथेला वेगळा आणि आकर्षक आयाम प्राप्त झाला आहे.पुस्तकाबाबत भावना व्यक्त करताना इशिकाने सांगितले की, वाचनाची आवड तिला बालपणापासून असून त्याची प्रेरणा तिचे वडील दिवंगत डॉ. विजय शांताराम पाटील यांच्याकडून मिळाली. रहस्य आणि थ्रिलर साहित्यप्रकारांबद्दल असलेल्या आकर्षणामुळे हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
पुस्तकातील पात्रांची नावेही तिने आपल्या आवडत्या फॉर्म्युला वन ड्रायव्हर्सना समर्पित केली आहेत.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देत साहित्यनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद ठरत असून, नवोदित लेखक घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

