ऐतिहासिक वारसा, मध्यवर्ती स्थान, राष्ट्रीय महामार्गाची सुविधा व जागा उपलब्धतेचा दाखला; ग्रामीण नागरिकांच्या हितासाठी नशिराबादची मागणी
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय कोठे स्थापन करावे, याबाबत प्रशासनाने दि. ८ जुलै २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागविल्या होत्या.त्यानुसार नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती पंकज शामकांत महाजन यांनी उपविभागीय अधिकारी, जळगाव विभाग, जळगाव यांच्याकडे रीतसर हरकत व निवेदन दाखल करून अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद शहरातच स्थापन करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नशिराबादच्या ऐतिहासिक, प्रशासकीय व भौगोलिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.ब्रिटिशकालीन परगणा म्हणून नशिराबादची ओळख असून त्या काळात येथे न्यायालय कार्यरत होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक, प्रशासकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नशिराबाद ही पूर्वापार महत्त्वाची बाजारपेठ राहिलेली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्गालगत व तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नशिराबाद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अप्पर तहसील कार्यालयात ये-जा करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे शासकीय सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, नशिराबाद नगरपरिषदेच्या माध्यमातून अप्पर तहसीलकार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय उभारणीसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.अप्पर तहसील कार्यालयाची संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची असल्याने हे कार्यालय जळगाव शहरात स्थापन करण्याऐवजी सर्वांना सहज उपलब्ध असलेल्या नशिराबाद शहरातच उभारणे अधिक योग्य व न्याय्य ठरेल, असे पंकज महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे.तसेच अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे स्थापन झाल्यास शहराच्या ऐतिहासिक वैभवाला नवसंजीवनी मिळेल, परिसराच्या विकासाला गती मिळेल आणि ग्रामीण भागातील नागरिकांची प्रशासकीय कामे अधिक सुलभ व गतिमान होतील.त्यामुळे जळगाव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद शहरातच मंजूर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.