नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील गणेश नगर (न्यू इंग्लिश स्कूलजवळ, न्यू प्लॉट एरिया) परिसरात नुकत्याच झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा तसेच शासकीय निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप करत रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.संबंधित कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनानुसार, संबंधित कामासाठी सुमारे ₹9,96,936 इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जीएसटी वजा करून ₹8,01,224 इतकी रक्कम संबंधित ठेकेदाराला मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरण्यात आल्याचा तसेच ब्लॉक बसविण्यापूर्वी करण्यात आलेले पीसीसी (PCC) बेसवर्कही दर्जाहीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.याशिवाय प्रत्यक्ष ठिकाणी केवळ २२ मीटर रुंदी व ३२ मीटर लांबी इतकेच काम झाल्याचे नमूद करत, बाजारभावानुसार या कामाची किंमत सुमारे ₹३.७५ लाखांच्या आसपास असल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे मंजूर निधीच्या तुलनेत मोठी आर्थिक तफावत असून शासकीय निधीचा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काम सुरू असताना अथवा पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने किंवा अभियंत्याने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली नसल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच कामाच्या दर्जाबाबतचे छायाचित्रे व इतर पुरावेही निवेदनासोबत सादर करण्यात आले आहेत.दरम्यान, या प्रकरणाबाबत नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली आहे. सदरील कामाचे कोणतेही देयक अद्याप अदा करण्यात आलेले नाही. त्रयस्थ शासकीय यंत्रणेमार्फत कामाची तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच बिलाबाबत निर्णय घेतला जाईल. तपासणीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पेव्हर ब्लॉकची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी (Lab Testing) करण्यात यावी तसेच शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

