Sunday, November 29, 2026
police dakshta logo
Homeक्राईमशनीपेठ पोलिसांची अवैध गोमांस साठवणूक व विक्रीप्रकरणी कारवाई; ११ हजार ४०० रुपयांचा...

शनीपेठ पोलिसांची अवैध गोमांस साठवणूक व विक्रीप्रकरणी कारवाई; ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपी निष्पन्न

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक, कत्तल तसेच गोमांसाची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, शनीपेठ पोलिसांनी शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर २०२६) इस्लामपुरा परिसरात छापा टाकून गोमांस साठवणूक व विक्रीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे २१ किलो संशयित मांसासह एकूण ११ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न झाले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल आणि गोमांसाची अवैध साठवणूक व विक्री रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित अवैध प्रकारांवर लक्ष ठेवून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार दि. २७ नोव्हेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपुरा परिसरात गोमांसाची अवैध साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घर क्रमांक ४४ येथे पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून तपासणी केली. यावेळी अंदाजे २१ किलो संशयित मांस, लोखंडी सुरी, वजनकाटा, जुना फ्रिज, वजनाचे पातेले व लाकडी कुंदे असा एकूण ११ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राजपूत यांना पाचारण करून संशयित मांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते सीलबंद करण्यात आले आहेत.या प्रकरणात शेख कलीम शेख अब्बास कुरेशी व त्याचा लहान भाऊ नईम शेख अब्बास कुरेशी यांच्यासह त्यांच्या घरातील अन्य चार महिला सदस्यांविरुद्ध असे एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.विशेष म्हणजे, शनीपेठ पोलीस ठाण्याकडून मागील १५ दिवसांत गोमांसासंदर्भात करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. तसेच निष्पन्न झालेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील अंमलदार, गुन्हेशोध पथकातील अंमलदार तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या