Sunday, November 29, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; कसोदा व अमळनेरमध्ये दोन...

जळगाव जिल्हा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; कसोदा व अमळनेरमध्ये दोन गुन्हे दाखल!

दोन डंपर व ९ ब्रास वाळूसह २३ लाख ४२ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार जणांविरुद्ध कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार २७ नोव्हेंबर २०२६ रोजी कसोदा आणि अमळनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत दोन डंपर आणि एकूण ९ ब्रास वाळूसह तब्बल २३ लाख ४२ हजार ५५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कसोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई :

कसोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कसोदा उतरण रस्त्यावरील इंदिरा नगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करताना एक डंपर आढळून आला. या डंपरमध्ये ३ ब्रास वाळू होती. याप्रकरणी डंपर चालक धर्मेश कैलास पाटील (रा. बिलाडी, ता. जि. धुळे) आणि डंपर मालक आकाश राजेंद्र पाटील (रा. रेल्वे स्टेशन रोड, धुळे) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. संबंधित डंपरची किंमत ८ लाख १४ हजार २०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कसोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई :

दरम्यान, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना गोपनीय बातमीदारामार्फत गांधली ते अमळनेर रोडवरून एका डंपरमधून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.२७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता पथक गांधली ते अमळनेर रस्त्यावर गस्त घालत असताना नवलभाऊ आर्मी स्कूलसमोर गांधलीकडून एक डंपर येताना दिसला. पथकाने डंपर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र, चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही.चालकाने आपले नाव अनिल चंद्रसिंग मोरे (वय २५, रा. रबजी नगर, बहादरपूर रोड, अमळनेर) असे सांगितले. तसेच डंपर मालकाचे नाव अकबर पठाण (रा. रबजी नगर, बहादरपूर रोड, अमळनेर) असल्याचे सांगितले. डंपरमधील वाळू ही अमळनेर तालुक्यातील जळोद गावाजवळील तापी नदीतून भरल्याचे चालकाने सांगितले. पथकाने तपासणी केली असता डंपरमध्ये विनापरवाना ६ ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले.या कारवाईत १५ लाख २८ हजार ३५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक व मालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी तसेच अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलांमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या