Sunday, November 29, 2026
police dakshta logo
Homeक्राईमपूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार; जीवे मारण्याचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार; जीवे मारण्याचा प्रयत्न

मुख्य आरोपीसह साथीदाराला भडगाव पोलिसांकडून अटक; कजगाव येथील घटनेने परिसरात खळबळ

भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कजगाव (ता. भडगाव) येथे पूर्ववैमनस्यातून एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मुन्ना ऊर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पियुष ऊर्फ विक दिलीप पाटील (वय २२, रा. कजगाव, ता. भडगाव) असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २३, रा. कजगाव, ता. भडगाव) आणि मुख्य आरोपी मुन्ना ऊर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत यांच्यात घटनेच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून गिरीश राजपूत याने जयेश पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास जयेश पवार हे कामावर जात असताना गोंडगाव-कजगाव रस्त्यावरील सोलर प्लांटजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांच्या डोक्याला व छातीला गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मी सेवा हॉस्पिटल, धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.या घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश टाक यांना तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी विशेष पथक तयार करून घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून आवश्यक भौतिक पुरावे संकलित करण्यासह गोपनीय यंत्रणेमार्फत आरोपींचा शोध सुरू केला.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पियुष ऊर्फ विक दिलीप पाटील (वय २२, रा. कजगाव, ता. भडगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मुख्य आरोपी मुन्ना ऊर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही जयेश पवार यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.अशा प्रकारे या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, नेमणूक भडगाव पोलीस स्टेशन, हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार व पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या