पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांची कठोर प्रतिबंधात्मक कारवाई; यावल व भुसावळ परिसरातील गुन्हेगारी टोळीवर कारवाईचा बडगा
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने यावल व भुसावळ परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत.हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे समशेर शाह सलीम शाह (वय २८, रा. बहेरपुरा, चौपडा नाका, यावल, जि. जळगाव) आणि समीर ऊर्फ भांजा रहमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी, यावल, ता. यावल, जि. जळगाव) अशी आहेत.
सदर आरोपींनी टोळी तयार करून भुसावळ शहर व यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल व रोख रक्कम चोरी करणे, सामान्य नागरिकांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरीने हिसकावून घेणे, महिलांना मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध लोहमार्ग भुसावळ, यावल आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपींविरुद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याने यावल पोलीस ठाण्यामार्फत हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. संबंधित प्रस्तावाची चौकशी करून प्राप्त अहवाल व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

