Thursday, July 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादेहू ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद विठ्ठल व संत तुकारामांच्या...

देहू ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद विठ्ठल व संत तुकारामांच्या वेशभूषेतील कामगारांनी वेधले वारकऱ्यांचे लक्ष

पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने देहू ते आकुर्डी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कामगार प्रबोधन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिंडीत विविध आस्थापनांतील सुमारे १०० ते १२५ कामगार, कामगार कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त कामगारांनी सहभागी होत वारकरी परंपरेतून सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी साकारलेली विठ्ठलाची वेशभूषा आणि ह.भ.प. शामराव गायकवाड महाराज यांनी धारण केलेली संत तुकाराम महाराजांची वेशभूषा होय. या दोघांच्या वेशभूषेने वारकरी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अभंग गायन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण दिंडी भक्तिरसात न्हाऊन निघाली.यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, “साक्षात विठ्ठलाच्या वेशभूषेत सहभागी झाल्यामुळे अनेक भाविकांनी ‘माऊली’ म्हणत दर्शन घेतले. आम्हालाही वारकरी भक्तांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.” गेल्या दोन वर्षांपासून आपण विठ्ठलाच्या वेशभूषेत एकदिवसीय वारीत सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात विविध आस्थापनांतील कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे यांनी सांगितले की, या प्रबोधन दिंडीत सहभागी झालेले कामगार, साहित्यिक व वारकरी अभंग, भजन आणि फुगडीच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत आनंदोत्सव साजरा करतात. यावेळी ह.भ.प. शामराव गायकवाड महाराज यांचे प्रवचनही झाले.कामगार कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे, पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज पाटील आणि अधीक्षक संजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे, कल्याण उपायुक्त मनोज पाटील, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, ह.भ.प. शामराव गायकवाड, अधीक्षक संजय थोरात, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, कल्याण निरीक्षक संदीप गावडे, केंद्र संचालक प्रदीप बोरसे, चाकणचे केंद्र संचालक अविनाश राऊत, अनिल कारळे, सुनील बोराडे, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश हंचाटे, लक्ष्मण इंगोले, शंकर नाणेकर, राजेश हजारे, यादव तळवले, शिवराज शिंदे, सुहास माने, सुदाम शिंदे, सुरेखा मोरे, उज्वला अवघडे, संगीता क्षीरसागर, रूपाली मुळीक यांच्यासह विविध आस्थापनांचे कामगार प्रतिनिधी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिंडीनंतर प्रीमियम ट्रान्समिशन, प्रीमियम मित्रपरिवार यांच्या वतीने सहभागींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. जाधववाडी व भोसरी येथील भजनी मंडळांनी भजन सादर केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या