भरधाव कार चिखलात अडकल्याने संशयितांचा बेत फसला; फरार साथीदारांचा शोध सुरू!
रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर शहरातून भरधाव वेगाने धावणाऱ्या एका संशयास्पद कारचा पाठलाग करत पोलिसांनी आणि सतर्क नागरिकांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात हे आरोपी दरोडा टाकण्याच्या अथवा लुटमारीच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पालकडून आभोडा मार्गे आलेली मारुती सुझुकी कार (क्र. एमएच-१९-२४०३) रावेर शहरातून अतिवेगाने धावत होती. या वाहनामुळे शहरातील अनेक ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. आठवडे बाजार परिसरातील जुन्या नाल्याच्या मार्गाने महामार्गाकडे जाण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र, कार चिखलात अडकल्याने त्यांचा पुढील बेत फसला. याचवेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखिल प्रवीण पाटील (वय २०), अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. घोडबंदर, जि. ठाणे) तसेच मेहेरबान जहागीर तडवी (रा. पाल) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील इतर काही साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.आरोपींकडून एक तलवार, टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, सुती दोरी, लहान मुलांच्या खेळातील बनावट नोटांचे एक बंडल तसेच सुमारे तीन लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कार असा एकूण अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.