Friday, July 10, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादक्षिण सोलापूरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित वक्तव्यावरून संताप

दक्षिण सोलापूरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित वक्तव्यावरून संताप

सखोल चौकशी करून योग्य कारवाईची जळगावातील पशुवैद्यकीय संघटनांची मागणी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दक्षिण सोलापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे यांनी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाबाबत कथितरीत्या मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाचा जळगावातील पशुचिकित्सा व्यवसायी संघटना तसेच पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवासंघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.संघटनांच्या निवेदनानुसार, पशुधन पर्यवेक्षक हे पशुसंवर्धन विभागातील अराजपत्रित तांत्रिक पद असून ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा प्रभावीपणे राबविण्यात या संवर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राज्यातील दुग्धव्यवसाय आणि धवल क्रांतीला गती देण्यातही पशुधन पर्यवेक्षकांचे मोठे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा संवर्गाविषयी कथितरीत्या अवमानकारक वक्तव्य झाल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असून, यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे संघटनांनी म्हटले आहे.या प्रकरणाचा जळगावातील शासकीय व खासगी कर्मचारी संघटनांसह राज्यस्तरीय संघटनांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि चौकशीअंती दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणासंदर्भात संबंधित अधिकारी अथवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या