मुनिश्री १०८ कुंथू सागर महाराज व क्षुल्लक १०५ अटल सागरजी महाराज यांच्या शुभहस्ते नवीन वास्तूचे नामकरण; जैन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या नवीन वास्तूचा नामकरण सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भगवान आदिनाथ स्वामी ज्या पावन अष्टापद तीर्थावरून मोक्षगामी झाले, त्या पवित्र स्थळाच्या स्मृतीस अभिवादन करत या नवीन वास्तूस ‘अष्टापद – शांती विद्या भवन’ असे नामकरण करण्यात आले.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य परमपूज्य मुनिश्री १०८ कुंथू सागर महाराज तसेच क्षुल्लक १०५ अटल सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात आणि शुभहस्ते या वास्तूचे नामकरण करण्यात आले. संतांच्या मंगल उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून जैन समाजबांधवांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी जैन समाजातील महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला.नवीन ‘अष्टापद – शांती विद्या भवन’ हे भविष्यात धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल जैन समाजाने परिश्रम घेतले असून उपस्थित भाविकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.