फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत हजारो रुपयांचे कच्चे रसायन, तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली असून दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिली कारवाई १६ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता यावल तालुक्यातील कासवा येथील तापी नदीपात्रात करण्यात आली. येथे दशरथ दिलीप सपकाळे (रा. कासवा, ता. यावल) हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ११ हजार ५०० रुपये किमतीचे ८०० लिटर गुळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन, ७० लिटर तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ. विकास सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर १७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता पाडळसा (ता. यावल) येथील राजाभोये नाल्यात गणेश रविंद्र कोळी (रा. पाडळसा) याच्या हातभट्टीवर पोलिसांनी दुसरा छापा टाकला. या कारवाईत ५ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर गुळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन, ३५ लिटर तयार गावठी दारू आणि हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर इब्राहिम तडवी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार संतोष चौधरी, सहायक फौजदार मोती पवार, पोहेकॉ. विकास सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर तडवी यांनी संयुक्तपणे पार पाडली. अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधातील विशेष मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा फैजपूर पोलिसांनी दिला आहे.