जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून लुटलेला ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वीही जबरी चोरी व चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), १२६(२) व ३५ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता फिर्यादी मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे मोटारसायकलवरून जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना दोन अज्ञातांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. फिर्यादीकडे पैसे नसल्याने आरोपींनी त्यांच्याकडील विवो कंपनीचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मुकेश अटवाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत केला.तपासादरम्यान आरोपी अक्षय मुकेश अटवाळ याच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी व चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ. अकरम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कापडणे, छगन तायडे, प्रदीप सपकाळे आणि राहुल रगडे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ. दीपक शिरसाठ करीत आहेत.