दोन पीडित महिलांची सुटका; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद : नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सुनसगाव रोडलगत एका शेतात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार खाजगी पंटरमार्फत माहितीची खातरजमा करून मंगळवारी दुपारी सुमारे २:२० वाजता पोलिस पथकाने छापा टाकला.या कारवाईत प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) व कैलास संजय भोई (दोघेही रा. नशिराबाद) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांच्या सांगण्यावरून संबंधित ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ३,४,५, व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली.
कारवाईत सहभागी पोलीस पथक
सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोहेकॉ. गुणवंत देशमुख, पोहेका. प्रशांत विरणारे, पोको. भरत बाविस्कर, पोको. पंकज सोनवणे, पोको. सागर बिडे, पोका. प्रविण लोहार, पोको. भूषण पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.