कायमस्वरूपी सफाई कामगार नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी; जंतूनाशक पावडर व औषध फवारणीचीही मागणी
सुनसगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी जितेंद्र काटे) : तालुक्यातील सुनसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगाराअभावी गावातील विविध भागांतील गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, काही नागरिक स्वतःहून गटारींची साफसफाई करून घेत असल्याचे चित्र आहे.सुनसगाव येथे यापूर्वी गोंभी येथील एक सफाई कामगार गटारींची साफसफाई करण्याचे काम करीत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावातील गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचल्याचे दिसून येत आहे. संबंधित सफाई कामगाराशी याबाबत विचारणा केली असता, ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी त्याला कामावर ठेवण्यास नकार दिल्याचे त्याने सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही सदस्यांचा कामगाराला पुन्हा कामावर ठेवण्यास होकार, तर काहींचा विरोध असल्याची चर्चा आहे.याबाबत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, नवीन सफाई कामगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गोंभी व सुनसगाव या दोन्ही गावांसाठी एकच ग्रामपंचायत असल्याने उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावात अंत्यविधीच्या वेळी अथवा शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारानंतर साफसफाईची कामे याच सफाई कामगाराकडून करून घेतली जात असतील, तर नवीन सफाई कामगार मिळेपर्यंत गावातील गटारींची साफसफाईही त्याच्याकडून करून घेण्यात काय अडचण आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विशेषतः प्रभाग क्रमांक ३ मधील गटारींची अवस्था गंभीर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी याच गटारींच्या प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्य व एका नागरिकामध्ये शाब्दिक वाद झाल्याची चर्चाही गावात आहे.गावातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सुनसगावसाठी किमान एक कायमस्वरूपी सफाई कामगार नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच तुंबलेल्या गटारींची तातडीने साफसफाई करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतूनाशक पावडर टाकावी आणि आवश्यक त्या ठिकाणी औषधांची फवारणी करावी, अशी मागणीही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात आली आहे.