अंगणवाडी सेविकेकडे सचिवपदाचा कार्यभार दिल्याने वाद; महिला ग्रामसभा मात्र चर्चेनंतर पार पडली
सुनसगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी जितेंद्र काटे) : तालुक्यातील सुनसगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. ग्रामसेवकांच्या ऐवजी अंगणवाडी सेविकेकडे ग्रामसभेच्या सचिवपदाचा कार्यभार देण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अखेर कोणताही विषय मंजूर न करता सर्वसाधारण ग्रामसभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, महिला ग्रामसभा मात्र चर्चेनंतर घेण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी ९ वाजता महिला ग्रामसभा, तर सकाळी १०.३० वाजता सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामसभा होऊ न शकल्याने या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.सुरुवातीला महिला ग्रामसभेसाठी महिलांची उपस्थिती अत्यल्प होती. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर गावातील सुमारे १५ ते २० महिला उपस्थित झाल्याने तहकूब केलेली महिला ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या सुरुवातीलाच उपस्थित महिलांनी गावातील केबल चोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभेत काही काळ चर्चा रंगली. त्यानंतर तीन विषयांवर चर्चा होऊन महिला ग्रामसभा पार पडली.
यानंतर त्याच ठिकाणी सर्वसाधारण ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. मात्र ग्रामसेवक उपस्थित नसल्याने अंगणवाडी सेविकेकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी अजेंडा वाचण्यास सुरुवात करताच ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे कोणताही विषय मंजूर न करता सभा तहकूब करण्यात आली.दरम्यान, ग्रामसभेच्या सुरुवातीलाच लाऊडस्पीकरच्या व्यवस्थेवरूनही काही काळ वाद निर्माण झाला. त्यानंतर गावातील तरुणांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शांततेचे आवाहन केले. ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असल्याचे समजल्यानंतर काही युवक थेट ग्रामपंचायत कार्यालयात गेले आणि त्यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. प्रत्येक प्रभागात प्रथम ग्रामपंचायत सदस्यांनी सभा घेऊन त्यानंतर ग्रामसभा आयोजित करावी, या मागणीसह अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवक युनियनने ग्रामसभेवर बहिष्कार टाकला असल्याने अंगणवाडी सेविकेकडे सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याचे ग्रामसेवक प्रतिभा तायडे यांनी सांगितले. तर अजेंड्यावर घरकुल योजनेच्या मंजुरीचे वाचन तसेच सन २०२६-२७ चा कृती आराखडा मंजूर करणे आवश्यक असल्याने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे सरपंच काजल कोळी यांनी सांगितले.
ग्रामसभा तहकूब झाल्याने विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांचे वाचनही होऊ शकले नाही. त्यामुळे संबंधित अर्जदारांनाही पुढील ग्रामसभेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीच्या विहिरीतील केबल वायर चोरीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत ग्रामपंचायत शिपाई पंकज पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याने हे नाव कोणी नमूद केले, या मुद्द्यावरही ग्रामसभेत चर्चा होणार होती. मात्र ग्रामसभा तहकूब झाल्याने हा विषय चर्चेत आला नाही. याबाबत पंकज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असून, आपल्याला न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर आता पुढील ग्रामसभा कधी होणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.