Thursday, September 10, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशेताच्या बांधावर भरला विद्यार्थ्यांचा ‘निसर्गाचा वर्ग’

शेताच्या बांधावर भरला विद्यार्थ्यांचा ‘निसर्गाचा वर्ग’

क्षेत्रभेटीतून पिकांची ओळख, मातीचे महत्त्व व निसर्गसंवर्धनाचे धडे

सावदा : लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, सावदा संचलित प्राथमिक विद्यामंदिर, सावदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने शेतातील क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध पिके, माती, शेतीपद्धती आणि निसर्गसंवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले.क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मका, कापूस, केळी, तूर, उडीद व मूग आदी पिकांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. पिकांची वैशिष्ट्ये, लागवडीची पद्धत, वाढीची प्रक्रिया तसेच पिकांसाठी आवश्यक माती, पाणी व हवामान याबाबत विद्यार्थ्यांना शेताच्या ठिकाणी माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष पिके पाहताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून सहभाग नोंदविला.या वेळी मातीचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशेषत्वाने समजावून सांगण्यात आले. मातीची सुपीकता टिकविणे, मातीची धूप रोखणे, सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे, अनावश्यक रासायनिक घटकांचा वापर टाळणे तसेच पाण्याची बचत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यासोबतच वृक्षसंवर्धन, पाणी बचत, मातीचे संरक्षण, प्लास्टिकचा मर्यादित वापर, परिसर स्वच्छता आणि जैवविविधतेचे संवर्धन याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. निसर्गाकडून मिळणाऱ्या संसाधनांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.वर्गातील पाठ्यपुस्तकीय ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाशी जोडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, प्रश्न विचारण्याची वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणाबाबत संवेदनशीलता तसेच श्रमप्रतिष्ठेची भावना विकसित होण्यास मदत झाली. शेत, माती, पिके आणि निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षणाचा अनुभव घेतला.या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका उषा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सुधाकर नेहेते, योगेश भास्कर महाजन, मंजुषा विजय चौधरी आणि वैशाली ईश्वर पद्मे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‘शिकणे म्हणजे केवळ पुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळविणे होय,’ हा संदेश देणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या