पोलीस अधिकारी, अंमलदार व ७० विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे प्रशिक्षण
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दल आणि सेफ लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ते सुरक्षा मित्र’ उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी, अंमलदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याबाबत आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. ही कार्यशाळा २७ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सवय रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली सेफ लाईफ फाउंडेशनच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण ६० पोलीस अधिकारी-अंमलदार आणि ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कोहिनूर, रायसोनी कॉलेज, नूतन मराठा महाविद्यालय, तसेच त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट, पॉलिटेक्निक, जळगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.प्रशिक्षणादरम्यान रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, रस्ते अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने व सुरक्षितपणे मदत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अपघातानंतरचा पहिला प्रतिसाद वेळेत आणि योग्य पद्धतीने दिल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ (Zero Fatality District) या कार्यक्रमांतर्गत रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सेफ लाईफ फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून अपघातानंतर तातडीने मदत मिळवून देणे, रस्ते अपघातांविषयी जनजागृती करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी पोलीस यंत्रणेची तत्परता आणि प्रतिसाद क्षमता वाढविण्यावरही भर देण्यात आला.
या कार्यशाळेत सेफ लाईफ फाउंडेशनच्या प्राची व्यास, प्रियांकित पनवर, विवेक भुसे, शिवम सिंह, तसेच आयसीआयसीआय लोम्बार्डचे नजीम खान आणि कपिल सिंह यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस परिमंडळाचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जळगाव विभागातील संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि अपघातग्रस्तांना वेळेत मदत करावी, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.