Sunday, October 25, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद नगरपरिषदेतील पात्र कंत्राटी कामगारांना वार्षिक बोनस द्या!

नशिराबाद नगरपरिषदेतील पात्र कंत्राटी कामगारांना वार्षिक बोनस द्या!

जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसह घनकचरा व्यवस्थापन व इतर कंत्राटी कामांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियम, १९६५ व लागू नियमांनुसार वार्षिक बोनस मिळावा, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप अनिल साळी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.नशिराबाद शहरातील विविध विकासकामे, स्वच्छता व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यात कंत्राटी कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कामगारांना कायद्यानुसार देय असलेला वार्षिक बोनस मिळतो किंवा नाही, याची प्रशासनाने पडताळणी करावी आणि पात्र कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.निवेदनात पात्र कंत्राटी कामगारांची माहिती संकलित करून त्यांना नियमानुसार बोनस दिला जात असल्याची खात्री करावी, संबंधित कंत्राटदारांना बोनस अदा करण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच बोनस वितरणासंदर्भातील नोंदी व पुराव्यांची तपासणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे.याशिवाय, पात्र कामगारांना बोनस देण्यास टाळाटाळ होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या विविध कंत्राटी कामांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

कामगारांच्या हक्कांसाठी संघटना आक्रमक
कंत्राटी कामगार शहराच्या विकासासाठी आणि स्वच्छता व्यवस्थेसाठी प्रत्यक्ष मेहनत घेत असतात. त्यामुळे त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला आणि कायद्यानुसार देय असलेले आर्थिक लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. पात्र कामगारांना दिवाळीपूर्वी वार्षिक बोनस मिळावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी अध्यक्ष प्रदीप साळी यांनी केली आहे.या निवेदनाच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पात्र कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्यासाठी काय कार्यवाही केली जाते, याकडे संबंधित कामगारांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या