Friday, October 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईमअपघातग्रस्त वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक; निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई!

अपघातग्रस्त वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक; निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई!

दोन आरोपींना अटक; ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध साठवणूक, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध निंभोरा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अपघातग्रस्त वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, वाहनासह एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगदाद फाट्याजवळ, ता. रावेर येथे एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ठाकणे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी सिल्व्हर रंगाची ह्युंदाई कंपनीची आय-२० कार (क्रमांक MH-२८-V-४४२३) अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला असल्याचा संशय पोलिसांना आला.अपघातामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊन सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी संबंधित वाहन, वाहनचालक व त्याच्यासोबत असलेल्या इसमास निंभोरा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत अजीम हैदर सय्यद (वय २३ वर्षे, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख महमद कासिम (वय २३ वर्षे, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून, प्रतिबंधित गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा व पानमसाला, ज्याची किंमत ५ लाख ९० हजार ४४० रुपये आहे, तसेच ह्युंदाई आय-२० कार, ज्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे, यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक ठाकणे आणि निंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरू असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या