पाळधी | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- पाळधी येथे वाघूर धरण सिंचन लाभधारक समितीच्या सदस्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची भेट घेऊन रब्बी हंगामासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनाही देण्यात आले.यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. पाऊस अनियमित व कमी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या वाघूर धरणात सध्या ७३ टक्के जिवंत पाणीसाठा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रातील डावा व उजवा कालवा यामधून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दोन आवर्तनांसाठी धरणातील केवळ ३ ते ४ टक्के पाणीसाठा आवश्यक असल्याने त्याचा मोठा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर होणार नाही. उलट, या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिके घेणे शक्य होऊन पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, वाघूर धरणातील पाणीसाठा कमी असतानाही धरणातील मृतसाठ्याचा काही भाग जळगाव शहरासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठीही आवर्तन सोडण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती समितीने केली आहे.दरम्यान, वाघूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे एक ते दोन आवर्तन मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता व संबंधित विभागाकडून वस्तुनिष्ठ माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी सिंचन लाभधारक समितीचे सदस्य लालचंद पाटील, तुषार महाजन, किशोर चौधरी, मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी, धनराज राणे, अरुण पाटील तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.