१५ ते २० जणांच्या जमावाची तरुणाला मारहाण: चॉपरच्या वाराने मृत्यू; १० ते १५ जण चौकशीसाठी ताब्यात
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह -: तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. प्रेम गोपाल धनगर (वय २१, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणावर धारदार चॉपरने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बोरनारसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रेम हा गेल्या काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे मामांकडे वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच तो आई-वडिलांची भेट घेण्यासाठी बोरनार येथे आला होता. बुधवारी गावात विवाह सोहळा असल्याने तो सायंकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. यावेळी काही जणांसोबत त्याचा वाद झाला. या वादानंतर सुमारे १५ ते २० जणांच्या जमावाने त्याला मारहाण केली. दरम्यान, जमावातील एका व्यक्तीने धारदार चॉपरने त्याच्या पाठीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर नातेवाईकांनी प्रेमला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात मारहाणीत सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी १० ते १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण आणि हत्येत सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रेमच्या अकाली निधनाने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.

