नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद शहरातील एसटी बससेवेच्या दैनंदिन नियोजनासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र कंट्रोल रूम सध्या नवीन बसस्थानकाच्या परिसरात उपलब्ध नसल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसच्या वेळा, मार्ग, पासेस तसेच अन्य वाहतूकविषयक माहितीसाठी प्रवाशांना नेमके कुठे संपर्क साधावा, याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने नवीन बसस्थानकाच्या लगतच कायमस्वरूपी एसटी कंट्रोल रूम उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नशिराबाद येथील जुन्या बसस्थानकातील एसटी कंट्रोल रूमची इमारत अतिक्रमणात काढण्यात आली. त्यानंतर काही काळ लगतची जागा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे कंट्रोलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ही जागाही आता खाली करण्यात आल्याने एसटी कंट्रोलरची तात्पुरती व्यवस्था नशिराबाद नगरपरिषदेच्या पाण्याच्या मुख्य टाकीखालील केबिनमध्ये करण्यात आली आहे.ही तात्पुरती व्यवस्था नवीन बसस्थानकापासून दूर असल्याने बाहेरगावाहून येणारे प्रवासी तसेच स्थानिक विद्यार्थी आणि नागरिकांना कंट्रोलरचा संपर्क कुठे साधायचा, याची माहिती सहज उपलब्ध होत नाही. परिणामी बसच्या वेळा, फेऱ्या, मार्ग, पासेस अथवा बससेवेशी संबंधित तक्रारी व अडचणी मांडण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.
बायपासवरील एसटी फेऱ्यांबाबतही प्रश्न?
नशिराबाद बायपासमार्गे ये-जा करणाऱ्या एसटी बसेसच्या नोंदी आणि त्या बसस्थानकात नियमितपणे येतात का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही एसटी बसेस बायपासमार्गे पुढे जाताना नशिराबाद बसस्थानकात प्रवेश करीत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना बस चुकण्याची किंवा बराच वेळ प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात येते.नवीन बसस्थानक कार्यान्वित झाल्यानंतर त्याच्या परिसरातच स्वतंत्र कंट्रोल रूम उपलब्ध असल्यास बसच्या येण्या-जाण्यावर देखरेख ठेवणे, फेऱ्यांची नोंद करणे तसेच प्रवाशांना बससेवेबाबत तत्काळ माहिती देणे अधिक सुलभ होऊ शकते. त्याचबरोबर बसस्थानकातून नियोजित फेऱ्या सुरळीतपणे चालविण्यासाठीही या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे.नगरपरिषदेने सध्या पाण्याच्या टाकीखाली तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली असली तरी प्रवाशांच्या दृष्टीने ही व्यवस्था दीर्घकालीन उपाय ठरणार नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने नशिराबादच्या नवीन बसस्थानकाच्या परिसरात स्वतंत्र, सुसज्ज आणि कायमस्वरूपी कंट्रोल रूमची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.एसटी महामंडळाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, बसफेऱ्यांचे नियोजन व नोंदणी व्यवस्था अधिक सक्षम करावी आणि नवीन बसस्थानकाजवळ कायमस्वरूपी कंट्रोल रूम उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नशिराबादकरांकडून व्यक्त होत आहे.