Saturday, October 3, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद शिवारात दुष्काळसदृश्य परिस्थितीचे पंचनामे सुरू

नशिराबाद शिवारात दुष्काळसदृश्य परिस्थितीचे पंचनामे सुरू

शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुष्काळ जाहीर केला असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव तालुक्याचाही समावेश आहे.दुष्काळाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पीक पाहणी करून पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन गावनिहाय शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचनाम्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे.प्रत्येक गावासाठी स्वतंत्रपणे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नशिराबाद शिवारातही ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतीपाहणी व पंचनाम्याचे काम सुरू असून, संबंधित शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात येत आहेत.दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नशिराबाद येथील पंचनामा प्रक्रियेसाठी ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, सहायक कृषी अधिकारी मनीषा कोंगे, ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी मोरे तसेच पीक पाहणी सहाय्यक संतोष कोळी यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या