Sunday, October 4, 2026
police dakshta logo
Homeजळगावमहिला शेतकऱ्यांना मिळाली अधिकृत ओळख; जळगावात प्रथमच प्रमाणपत्र वाटप

महिला शेतकऱ्यांना मिळाली अधिकृत ओळख; जळगावात प्रथमच प्रमाणपत्र वाटप

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महिला शेतकऱ्यांच्या शेतीतील योगदानाला अधिकृत ओळख मिळावी, त्यांचा सन्मान व आत्मविश्वास वाढावा तसेच विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम जळगावात राबविण्यात आला. राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचे महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर यांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमोदे खुर्द येथील गंगूबाई सुनील पाटील, सीमा शिवाजी पाटील, कल्पना कैलास पाटील, मनकुंवर पंडित सपकाळे, सवर्णा गजु कोळी आणि वर्षा जगदीश सोनवणे या सहा महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.शेतीच्या विविध कामांमध्ये महिलांचा मोठा आणि महत्त्वपूर्ण सहभाग असतो. पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामांसह पशुपालन, कृषी प्रक्रिया तसेच विविध कृषीपूरक व्यवसायांमध्ये महिला मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या योगदानाला औपचारिक मान्यता देण्याच्या दृष्टीने महिला शेतकरी प्रमाणपत्र हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची स्वतंत्र ओळख मिळण्यासोबतच सन्मान आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि नेतृत्व अधिक बळकट होण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होईल.या अभिनव उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे यांचा अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता, नायब तहसीलदार वाघ, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, उपकृषी अधिकारी अमित भामरे, राहुल साळुंखे आणि योगेश अत्रे यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमासाठी विनोद झवर, सचिन बाविस्कर आणि ज्ञानेश्वर कोळी यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या