सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ३ लाख रुपये किमतीचे मोबाइल शोधण्यात यश..!
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले तसेच गहाळ झालेले मोबाइल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे १८ हरवलेले मोबाइल फोन शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांचे हरवलेले व गहाळ झालेले मोबाइल फोन शोधून मूळ मालकांना परत मिळवून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सीईआयआर (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना आवश्यक मार्गदर्शन करून सूचना दिल्या.
त्यानुसार, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे हरवलेले व गहाळ झालेले मोबाइल फोन शोधण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकूण १८ मोबाइल फोन शोधण्यात आले. या मोबाइल फोनची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असून, ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.या मोहिमेदरम्यान सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल विठ्ठल बोरेसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस अंमलदार रमाकांत राठोड यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून गहाळ मोबाइल फोनचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाइल फोन पुन्हा मिळाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संजय गायकवाड, जळगाव यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल विठ्ठल बोरेसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी आणि पोलीस अंमलदार रमाकांत राठोड यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.