Saturday, November 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; घरातील वस्तू, पलंग आणि खिडक्यांना जाणवले हादरे; जीवितहानीचे वृत्त नाही

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज, शनिवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास जमिनीला सौम्य हादरे बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. सकाळी साधारण ९.१४ ते ९.२० वाजेदरम्यान अनेक नागरिकांना भूकंपासारखे धक्के जाणवले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचे, तर पलंग आणि बेडला हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव शहरासह भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर परिसरात या हालचाली जाणवल्याचे वृत्त आहे. विशेषतः रावेर तालुक्यातील सावदा, ऐनपूर, मोठा वाघोदा, खिर्डी तसेच आसपासच्या गावांमधील नागरिकांनी एक ते दीड सेकंदांपर्यंत हादरे जाणवल्याचे सांगितले.जामनेर शहरातील वाडी गल्ली, गणेशवाडी, जहागिरदारवाडा आणि श्रीकृष्णनगर परिसरातही घरांना अचानक कंप जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ तालुक्यातील काही भागांतही अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर भूकंपाच्या तीव्रतेबाबत आणि केंद्रबिंदूबाबत विविध दावे प्रसारित होत आहेत. काही प्राथमिक माहितीत भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचा तसेच केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असल्याचा उल्लेख केला जात आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने त्याबाबत निश्चित निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडूनही या घटनेची अधिकृत नोंद किंवा स्पष्टीकरण उपलब्ध नसल्याची माहिती आहे.सुदैवाने, प्राथमिक वृत्तानुसार अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावरील मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि कारण स्पष्ट होणार आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. हादरे पुन्हा जाणवल्यास शांतता राखून सुरक्षित मोकळ्या जागेचा आधार घ्यावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या