कमी पावसामुळे उत्पादनात आधीच घट; घराच्या आवारातून शेतमाल लंपास, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:-नशिराबाद शहरात चोरट्यांनी आता शेतमालालाही लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जितेंद्र सिताराम पाटील यांच्या घराच्या आवारात ठेवलेल्या सोयाबीनच्या सहा गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. चोरीचा प्रकार लक्षात येताच पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात तक्रार नोंदवून घेतली आहे.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गुणवंत देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच चोरीचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात आधीच मोठी घट झाली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतमाल चोरीच्या घटनांनाही सामोरे जावे लागत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर कष्ट करून पिकविलेला शेतमाल घराच्या आवारातही सुरक्षित नसल्याची भावना या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान होणे ही निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने तपास करून शेतमाल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चोरीस गेलेल्या सोयाबीनच्या सहा गोण्यांचा लवकरात लवकर शोध लागून संबंधित चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

