नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली असून, नशिराबाद टोलनाका परिसरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे एक डंपर महसूल पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
नायब तहसीलदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी नशिराबाद रुपेश ठाकूर, मंडळाधिकारी माटे आणि मंडळाधिकारी आंधळे यांच्या पथकाकडून नियमित गस्त घातली जात होती. यावेळी नशिराबाद टोलनाका परिसरात वाळूने भरलेले डंपर (क्रमांक एमएच १९ सीवाय ८९९२) अवैधरीत्या गौण खनिज अर्थात रेतीची वाहतूक करताना आढळून आले.महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत सदर डंपर ताब्यात घेतले. या वाहनाचे मालक गोकुळ कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) असल्याची माहिती मिळाली आहे. ताब्यात घेण्यात आलेले डंपर पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीत जमा करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल पथकाकडून नियमित गस्त आणि कारवाई केली जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

