Sunday, November 22, 2026
police dakshta logo
Homeजळगावपद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास उलगडणार आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीतून!

पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास उलगडणार आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीतून!

ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी घेतली विशेष मुलाखत; २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजता प्रसारण

जळगाव : जळगावचे सुपुत्र, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, खासदार तथा ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल देवराव निकम यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता आकाशवाणी जळगाव केंद्राच्या विशेष मुलाखतीतून उलगडणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ॲड. निकम यांच्या कार्याचा जळगावकरांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या बालपणापासून ते देशभर गाजलेल्या महत्त्वपूर्ण खटल्यांपर्यंतचा प्रवास जाणून घेण्याची संधी या मुलाखतीच्या माध्यमातून श्रोत्यांना मिळणार आहे.आकाशवाणी जळगाव केंद्राच्या ‘स्पंदन : वृत्त आणि व्यक्तींचं’ या विशेष कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या आठवणी, जळगावमधील सुरुवातीचे दिवस, मुंबईपर्यंतचा प्रवास, वकिली क्षेत्रातील कारकीर्द तसेच बॉम्बस्फोटांच्या घटनांसह २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यांमधील अनुभव आणि न्यायालयीन लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या विशेष मुलाखतीचे प्रसारण सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.२५ वाजता आकाशवाणी जळगावच्या १०२.१ एफएम आणि ९६३ किलोहर्ट्झ या माध्यमांवरून होणार आहे. तसेच ‘न्यूज ऑन एअर’ आणि ‘वेव्हज’ ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार असून, आकाशवाणीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ती पाहण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी कार्यक्रम अधिकारी विजय भुयार, ज्येष्ठ उद्घोषक नरेंद्रकुमार ठाकूर, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे राजेश भागवत आणि अमेय नेवे यांचे सहकार्य लाभले आहे.

जळगावच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि देशाच्या न्यायव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलू या मुलाखतीतून श्रोत्यांसमोर येणार असल्याने जळगावकरांसह नागरिकांसाठी ही मुलाखत विशेष आकर्षण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या