Sunday, November 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमदेव दर्शनाहून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावली

देव दर्शनाहून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावली

माऊली नगर कॉर्नरजवळ भरदिवसा चोरी; दीड तोळ्याच्या दागिन्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये

जळगाव | प्रतिनिधी • पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट कायम असून, आता दर्शनाहून घरी परतणाऱ्या महिलेलाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. स्वामीनारायण मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात असलेल्या शामल सचिन बोंडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात भामट्यांनी जबरदस्तीने ओढून नेल्याची घटना माऊली नगर कॉर्नर परिसरात घडली. या घटनेत सुमारे दीड तोळे वजनाची आणि अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शामल बोंडे या मंदिरातील दर्शन आटोपून घरी परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील माऊली नगर कॉर्नरजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी संधी साधली. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून संशयितांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बोंडे यांना मोठा धक्का बसला.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात सोन्याचे काही मणी पडलेले आढळून आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुख्य रस्ते आणि रहदारीच्या परिसरातही अशा प्रकारच्या चोऱ्या घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या