Tuesday, November 24, 2026
police dakshta logo
Homeजळगावभागपूर धरणाच्या वॉटर लिफ्टिंग प्रकल्पाची मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्याकडून...

भागपूर धरणाच्या वॉटर लिफ्टिंग प्रकल्पाची मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी

३१ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ; ३ हजार ५३३ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत राबविणार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर धरणाच्या प्रस्तावित वॉटर लिफ्टिंग प्रकल्पाची राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली तसेच प्रकल्पाची कामे नियोजनानुसार आणि गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

कडगाव शिवारातील वाघूर नदीच्या बॅकवॉटरमधील पाणी पंप हाऊसच्या माध्यमातून उचलून भागपूर धरणात साठविण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे. जळगाव, जामनेर आणि पाचोरा या तीन तालुक्यांतील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भागपूर धरणातून पाणी उचलून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मान्यतेनुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार ५३३ कोटी ५ लाख रुपये आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील २६ गावांना थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ५ मध्यम व ४४ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना वेळेवर आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीचे उत्पादन वाढविणे तसेच लाभक्षेत्रातील गावांचा कृषी विकास साधणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सध्या प्रकल्पांतर्गत पंप हाऊस आणि धरणाची कामे प्रगतिपथावर असून, कामांचा दर्जा आणि गती याबाबत यावेळी मंत्री गिरीश महाजन व खासदार स्मिता वाघ यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

या पाहणीप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, नशिराबादचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, नगरसेवक लालचंद पाटील, सभापती मनोज पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे, विकास धनगर, मिलिंद चौधरी, गुंजन पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या