Tuesday, November 24, 2026
police dakshta logo
Homeक्राईममोटारसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; ९ मोटारसायकली हस्तगत, ९ गुन्हे उघड

मोटारसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; ९ मोटारसायकली हस्तगत, ९ गुन्हे उघड

मध्यप्रदेशातील ४५ वर्षीय आरोपीला अटक; जळगाव शहर व जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील ४५ वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत जळगाव शहरातील ७ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील २ अशा एकूण ९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणी लावलेली त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक MH-19-EM-2330) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकेवाड यांना समांतर तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच जळगाव शहरातून आणखी ८ मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण ९ मोटारसायकली हस्तगत केल्या. या मोटारसायकलींची एकूण किंमत अंदाजे २ लाख ३२ हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकेवाड आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

कारवाईत सहभागी अधिकारी व पोलीस अंमलदार

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, राहुल रगडे, रविंद्र कापडणे आणि रिजवान शेख यांचा समावेश होता.जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकात पोलीस हवालदार विरेंद्र शिंदे, सतीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर आणि प्रणय पवार यांनी सहभाग घेतला.तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कुंदनसिंग बयास, मुबारक देशमुख, विकास पवार आणि हर्षल महाजन यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकानेही या कारवाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

या संयुक्त कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल झाली असून, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस पथकांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या