Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमSBI दरोडा प्रकरण; पोलीस अधिकाऱ्याने वडील व शालकाच्या मदतीने साधला होता डाव;...

SBI दरोडा प्रकरण; पोलीस अधिकाऱ्याने वडील व शालकाच्या मदतीने साधला होता डाव; साडेतीन कोटींचे सोने व रोकड आरोपींकडून हस्तगत…!

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी जबरी चोऱ्यांच्या मालिका सुरू असताना जळगाव येथील का.ऊ.कोल्हे शाळेजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत दोन दिवसापूर्वी भर दिवसा जबरी चोरी करण्यात झाली होती. या प्रकरणी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे; या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे.

स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला चाकू मारून चोरट्यांनी तब्बल चार कोटींचा ऐवज लुटून नेला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासात गुन्हा उघड केला आहे. इतकंच नव्हे तर ४८ तासांच्या आत चोरट्यांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे हे पोलीस प्रशासनाचे यश आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांमध्ये एक चक्क पोलीस उपनिरीक्षक, त्याचा मुलगा आणि बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे ,हे विशेष ..! राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या
कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेवर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दरोडा पडला होता आणि जळगाव शहर हादरले होते. काल सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आल्यानंतर कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांनी बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून दिले होते. त्यानंतर बँक व्यवस्थापक राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जावून लॉकरच्या चाव्या मागितल्या. यासाठी प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून व्यवस्थापकाच्या मांडीवर जोरदार वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील हल्ला चढवत हाताच्या बोटाला दुखापत केली. दोन्ही दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे व १७ लाख रूपयांची रोकड असा एकूण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर चोरून नेला होता.
दोन्ही दरोडेखोर पायी येतांना डोक्यात हेल्मेट घालून आले होते.त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून ते पसार झाले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली होती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या जबरी चोरीची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या घटनेचा उलगडा अवघ्या दोन दिवसात लागला.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, परिरक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांनी बँकेतील कर्मचारी व बँक मॅनेजर (फिर्यादी) यांना वेगवेगळी विचारपूस केली. त्यात बँकेतील स्टाफ तसेच फिर्यादी आणि मनोज सुर्यवंशी याचे जबानीत तफावत आढळली. मनोज सुर्यवंशी याचेवर संशय वाढल्याने त्याची बारकाईने विचारपूस करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा माझा पाहुणा शंकर जासक तसेच त्यांचे वडील रमेश जासक असे आम्ही मिळून केला आहे. जबरी चोरीतील नेलेले सोन्याचे दागीने व पैसे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत(मुंबई व) येथे घेवून गेले आहेत अशी माहिती दिली. पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधार्थ संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. गल्ली बोळातून फिरून वेगवेगळ्या पथकाने सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि धागेदोरे तपासले. त्यातून चोरट्यांचा मार्ग समजून आला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुसुंबा गावाच्या बसस्थानकजवळ मिळून आली तर बँकेचे डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचाऱ्यांचे मोबाईल एमआयडीसी परिसरातील एक नाल्यात मिळून आले होते. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी वेगवेगळे तीन पोलीस पथक तयार केले. पथकात परिरक्षवधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखा आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे अमंलदार यांचे पथक तयार करून कर्जत येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने शंकर जासक याच्या मिळालेल्या पत्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, तो पोलीस उप निरीक्षक पदावर कोकणातील रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासून कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजून आले आहे. त्याने त्याचा शालक मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस असल्याने त्याचे सोबत संगनमत करून शंकर रमेश जासक, त्याचे वडील रमेश राजाराम जासक (वय-६७) व शालक मनोज रमेश सुर्यवंशी अशांनी केला असून त्याने बँकेतून नेलेले सोने व रोकड देखील काढून दिली आहे. शोध पथकाने शंकर जासक याच्याकडून चोरीतील ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत केली आहे. उर्वरित ७० हजार रुपये हस्तगत करणे अद्याप बाकी आहे. शंकर जासक याच्यावर अगोदर निलंबनाची कारवाई झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे. पोलीस महासंचालकांनी रायगड पोलीस अधीक्षकांना शंकर जासक याला बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची सूचना केली आहे. शंकर जासक याचे वडील जळगावपासून जवळच असलेल्या मन्यारखेडा येथील रहिवासी आहेत अशी माहिती मिळाली आहे.

पोलीस प्रशासनाकडून तपास पथकाला बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. काल पुन्हा दिवसा दोन घरफोड्या झाल्या असून पोलिसांनी आता तर दिवसाही कॉलनी परिसरात गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या