जळगाव/ तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.खूनांच्या आणि दरोड्यांच्या मालिका सुरू असून पोलीस खात्याच्या निष्क्रियत्याबद्दल नागरिकांत संतप्त सूर निघत आहे.भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे.शांताराम भोलानाथ साळुंखे (३३) व राकेश भोलानाथ साळुंखे (२८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही, तोच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा देखील खून झाला आहे. एकाच रात्री एकामागून एक तब्बल तीन खून झाल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कंडारी गावातील शांताराम साळुंखे तसेच राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एका परिवाराशी जुना वाद आहे. त्या वादाची ठिणगी शुक्रवारी पडल्यानंतर हल्लेखोरांनी भावंडांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झालीत, तर इंगळे आणि साळुंखे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण आणि बाजारपेठचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहेत. हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेनं सुरू केलं आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे आणि मनोज मोरे यांची नावे समोर आली असून त्यांचा शोध बारकाईने सुरू आहे. शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहे.पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती, शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होता. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण तसेच बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.श्रीरामनगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला.. तो शवविच्छेदनासाठी हलविला आहे. दरम्यान या खुनांच्या मालिकेची ठिकठिकाणी चर्चा होत आहे.

