नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील झिपरू अण्णा महाराज मंदिरासमोरील स्मशानभूमीमध्ये सुरू असलेले सोलर पॅनल बसविण्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी नशिराबाद नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मागील २५ वर्षांपासून स्मशानभूमीचे सुशोभीकरण, वॉल कंपाऊंड बांधकाम, तसेच नारायण धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शंभरहून अधिक वृक्षारोपण आणि त्यांची देखभाल सुरू आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांशी चर्चा न करता सोलर पॅनलचे काम हाती घेण्यात आले. यावेळी ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक काढून टाकले तसेच मोठ्या झाडांची तोड केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
“सोलर प्रकल्प जनहितार्थ असला तरी तो सामूहिक सल्लामसलत, पर्यावरणाचा विचार आणि योग्य जागेची निवड या निकषांवर आधारित असावा. स्मशानभूमीऐवजी इतर पर्यायी जागा नगरपरिषदेकडे उपलब्ध आहेत,” असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
निवेदन देताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, अरुण भोई, सुकलाल कोळी, विजय वर्मा, शालिक कोळी, दीपक जंगम आदी उपस्थित होते.
याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “स्मशानभूमी हे श्रद्धेचे स्थान आहे. त्याचे स्वरूप बिघडवून कोणीही प्रकल्प लादू नये. प्रशासनाने जनभावनेचा सन्मान करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.”

