जळगाव /प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्याच्या राजकारणातील भाजप नेते देवेद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा वाद काही वेगळा राहिलेला नाही अगदी राज्यातील प्रत्येक नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यत माहित झालेला असतांना आता यात एकनाथ खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे.
खडसे म्हणाले कि, ‘‘देवेंद्र फडणवीसांना राजकीय नेते म्हणून घडविण्यात व भाजपा प्रदेशाध्यक्ष करण्यात माझा मोठा हात होता. त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. कालांतराने त्यांनी कुरघोडी केली. राजकारण आपल्या जागी आहे. मात्र, फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे’’, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.
खडसे म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवल्या. २०१४ च्या आधी विरोधी पक्षनेता असताना माझ्या मागची जागा त्यांना दिली. माझ्याऐवजी त्यांना बोलण्याची अनेकवेळा संधी दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यामध्ये त्यांचेदेखील कौशल्य होते. मात्र, नंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी केली. ज्या व्यक्तीला घडविले, त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करणे योग्य वाटत नाही”, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.