Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावबोगस कॉल सेंटरचा भांडाफोड ; माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के.फॉर्मवर पोलिसांचा छापा..!

बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड ; माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के.फॉर्मवर पोलिसांचा छापा..!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ममुराबाद रोडवरील एल.के. फॉर्म येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई करत परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २८ सप्टेंबर) दुपारी १ वाजता टाकलेल्या या छाप्यात कॉल सेंटरचा संपूर्ण सेट-अप, लॅपटॉपसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, फॉर्मचे स्थानिक मालक माजी महापौर ललित कोल्हे यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गुप्त माहितीवरून धाड.
शनिवारी (दि. २७) अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना या कॉल सेंटरविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून रविवारी छापा टाकला. छाप्यात पोलिसांना ३१ लॅपटॉपसह बोगस कॉल सेंटरचे हायटेक सेट-अप आढळून आले.

परदेशी नागरिकांना फसवणुकीचा डाव..
प्राथमिक चौकशीत उघड झाले की, या कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला “अधिकृत एजंट” असल्याचे भासवत, विविध प्रकारच्या आमिषांचे आमंत्रण देऊन परदेशी नागरिकांना गंडा घालत होते. डेटा तपासण्याच्या बहाण्याने तसेच आकर्षक योजनांचे प्रलोभन दाखवून फसवणूक केली जात होती.

आठ आरोपी ताब्यात, आंतरराज्यीय टोळीचे धागेदोरे..
पोलिसांनी या छाप्यात सध्या उपस्थित असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले. अटक आरोपींनी चौकशीत सांगितले की, कॉल सेंटरमध्ये साधारण २० ते २५ जण कार्यरत होते. त्यापैकी बहुतांश आरोपी हे राज्याबाहेरील रहिवासी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या टोळीचा आंतरराज्यीय स्तरावर मोठा फैलाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी चौकशीची दिशा
या प्रकरणातील कॉल सेंटर स्थानिक पातळीवर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फॉर्मवर सुरू असल्याने पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कॉल सेंटरमधून जप्त केलेला डेटा व उपकरणे यांची कसून तपासणी करण्यात येत असून, या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

ऑनलाईन फसवणुकीचा मोठा भांडाफोड.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखालील या धडक कारवाईमुळे जळगावात सुरू असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या मोठ्या टोळीचे भांडाफोड झाले आहे. पोलिसांचा हा सखोल तपास आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या