Monday, March 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहिला दिनानिमित्त नारीशक्ती संस्थेतर्फे आरोग्य शिबिर संपन्न

महिला दिनानिमित्त नारीशक्ती संस्थेतर्फे आरोग्य शिबिर संपन्न

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदार पंडित (एमबीबीएस, एमडी मेडिसिन), डॉ. प्रियंका पंडित (BDS, M.U.HS – कन्सल्टिंग डेंटल सर्जन व मुखरोग तज्ज्ञ), नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, रेड स्वस्तिक सोसायटीचे सचिव डॉ. गणेश पाटील व कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर उपस्थित होते. तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या आरोग्य शिबिरासाठी सुमारे 150 महिलांनी नोंदणी केली होती. शिबिरात थायरॉईड ग्रंथीचे आजार, जीवनशैलीतील बदल, मधुमेह तसेच दंत व मुखरोग या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. मंदार पंडित यांनी थायरॉईड ग्रंथीचे आजार, त्यांची लक्षणे तसेच योग्य आहार व व्यायामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रियंका पंडित यांनी दंत व मुखरोगांबाबत माहिती देत त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.शिबिरात सहभागी झालेल्या महिलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. तसेच CBC, BSL आणि थायरॉईड तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे यांनी महिलांच्या शरीरातील हाडांची झीज व हाडांची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा मौर्य व रेणुका हिंगू यांना “उत्कृष्ट कार्यकर्ता” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनीषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन तासखेडकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नेहा जगताप, संतोष जगताप व नाजिम शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, नीता वानखेडकर, विद्या जकातदार, शोभना मकवाना, कांचन पाटील, रेणुका हिंगू, लीना पाटील, हर्षा गुजराती, स्मिता पाटील, पूर्वी शहा व अर्चना पाटील आदी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या