Wednesday, March 11, 2026
police dakshta logo
Homeक्राईमरसलपूर येथे गोमांस विक्रीवर पोलिसांची धाड ; पिता-पुत्र अटकेत, एक फरार

रसलपूर येथे गोमांस विक्रीवर पोलिसांची धाड ; पिता-पुत्र अटकेत, एक फरार

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रसलपूर (ता. रावेर) येथील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकत दोन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत अंदाजे ३९ हजार रुपये किमतीचे सुमारे १७५ किलो गोमांस व धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

रावेर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ला येथे गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी लवकर गुन्हे शोध पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) व शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५, दोघे रा. रसलपूर) हे पिता-पुत्र गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापून विक्री करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच दोघांनी गल्लीबोळाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.या कारवाईत आरोपींकडून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे सुमारे १३० किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व एक धारदार कोयता जप्त करण्यात आला.

दरम्यान, पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कुरेशी मोहल्ल्यातील शेख नुरा शेख मुनीर यांच्या घराजवळील पायाच्या शेडमध्ये तपास केला असता, तेथे शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करताना दिसून आला. मात्र पोलिस पथक पोहोचण्यापूर्वीच तो गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झाला. त्या ठिकाणाहून सुमारे ५ हजार रुपये किमतीचे सुमारे २५ किलो गोवंश मांस व एक धारदार कोयता जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस स्टेशनला गुरनं. ९६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम १९९५ व सुधारित अधिनियम २०१५ मधील कलम ५, ५(ब), ५(क), ९, ९(अ), ९(ब), ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.या कारवाईत एकूण सुमारे ३९ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस व धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील (नेमणूक रावेर) यांच्या उपस्थितीत घेऊन त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी व शुभम काळे यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या