प्रतिनिधी । पाचोरा | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एक सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जेरबंद केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती तब्बल २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच एक रिकामी मॅगझीन असा मुद्देमाल लागला आहे. गिरणा पंपिंग रोड परिसरात वास्तव्यास असलेला आरोपी समाधान बळीराम निकम (वय ३७, मूळ रा. अंजाळा, ता. यावल) हा यापूर्वी चाळीसगाव, फैजपूर व यावल पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गिरणा पंपिंग रोड भागात एक सराईत गुन्हेगार वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पथकाने परिसरात धडक दिली. यावेळी एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी संशयावरून त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला गावठी कट्टा, जिवंत काडतूस व रिकामी मॅगझीन आढळून आली.
भाडेकरूंची सखोल चौकशी.
पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी केली असता आरोपीचे नाव समाधान निकम असल्याचे स्पष्ट झाले. तो पाचोऱ्यातील जाधववाडी येथे भाडेतत्त्वावर वास्तव्यास होता. तपासादरम्यान त्याच्यावर विविध गुन्ह्यांचे गुन्हे चाळीसगाव, फैजपूर व यावल पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहिम.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक पातळीवर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच रणजित देवसिंग पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर, श्रीराम शिंपी, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील व भूषण पाटील यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
नागरिकांना आवाहन.
कारवाईनंतर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपले घर अथवा जागा भाड्याने देताना भाडेकरूंची योग्य चौकशी करावी, त्यांची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी. अन्यथा गुन्हेगार भाडेकरूच्या आडोशाला राहून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात.”
ही कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, पाचोरा पोलिस कोणत्याही गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाहीत व कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

