अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन पोलीस कर्मचारी आणि एका खाजगी पंटरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल १२ हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध गॅस रिफिलिंगसाठी मागितली लाच.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर बंदी असतानाही अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून गॅस भरणा केंद्र सुरू करण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली होती. या संपूर्ण व्यवहारात एका खाजगी पंटरचा मध्यस्थ म्हणून सहभाग होता.
पान टपरीवर ठेवली लाचेची रक्कम.
तक्रारदाराने ही बाब धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मांडली. तक्रार पडताळून पाहिल्यानंतर एसीबीने सापळा रचला. नियोजनाप्रमाणे तक्रारदाराने पान टपरीवर लाचेची रक्कम ठेवली, आणि त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत आरोपींना जाळ्यात ओढले.
अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा.
या प्रकरणाचा तपास सध्या धुळे एसीबीकडे सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एसीबीने कारवाईची प्राथमिक पुष्टी केली आहे.
जिल्हा पोलीस दलात खळबळ.
या घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमळनेरसारख्या संवेदनशील शहरात आधीच कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय ठरलेला असताना, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा लाचप्रकरणात सहभाग उघड झाल्याने पोलीस यंत्रणेवरील विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे.

