नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक श्री दुर्गा माता दौड उपक्रमाला यंदाही उत्साहात प्रारंभ झाला आहे. गेली तब्बल सात वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम गावातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे सहा वाजता या दौडीचे आयोजन केले जाते. देशभक्तीपर गीते, श्लोकांच्या घोषात तरुणाई छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्य, विचार व राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त करते. यामागील उद्देश तरुण पिढीला व्यसनमुक्त, धर्मभक्त व राष्ट्रभक्त घडविण्याचा आहे.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज पोटी असताना नवरात्रीत अखंड नऊ दिवस जागर करून आई तुळजाभवानीच्या चरणी देश-धर्म रक्षणासाठी वरदान मागितले होते. त्याच परंपरेचे पुनरुज्जीवन म्हणजेच श्री दुर्गा माता दौड असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. जात, पात, पक्ष, गट-तट विसरून हिंदुस्थानाला भगव्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो.
दररोज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दौडीची सुरुवात होऊन गावातील कुलस्वामिनी मंदिरात आरतीने समारोप केला जातो. यात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो.

