जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी आज रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव येथे सदिच्छा भेट देऊन केंद्रातील विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला. या वेळी त्यांनी मुलांचा अभ्यास, खेळ तसेच केंद्रात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रत्येक मुलाशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या क्षमतांविषयी जाणून घेतलं आणि त्यांना प्रोत्साहनपर कौतुकाचे शब्द दिले. मुलांच्या खेळकर स्वभावाला आणि शिकण्याच्या उत्साहाला त्यांनी मनापासून दाद दिली.
उडानच्या कार्याविषयी माहिती घेताना जिल्हाधिकारी यांनी संस्थेचं कौतुक व्यक्त केलं आणि पुढील वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शनही दिलं. त्यांच्या साध्या, निरागस गप्पांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसून आली, तर आत्मविश्वास आणि मनोबल अधिक दृढ झालं. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना साथ देत दिव्यांग मुलांच्या सबलीकरणासाठी हातभार लावावा, असा सकारात्मक संदेशही या भेटीतून उमटला.

