नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात कोर्टातील चेक बाउन्स प्रकरणावरून झालेल्या वादातून एका खाजगी आरओ-प्लांट व्यावसायिकाला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. घटनेत दि.२४ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास आरोपी दाम्पत्याने फिर्यादीच्या आरओ-प्लांट वरील पाण्याचे १० जार फेकून अंदाजे ५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान देखील केल्याची माहिती फिर्यादीत दिली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दि.२७ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ठीक २ वाजून ६ मी. अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादीची माहिती
भूषण बाबुराव पाटील उर्फ राजू पाटील (वय ३५, आरओ प्लांट व्यावसायिक रा. वरची आळी, सावता मंदिराजवळ, नशिराबाद) हे आपल्या कुटुंबासह नशिराबाद येथे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या खाजगी आरो-प्लांटवर काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.
घटनेचा तपशील
फिर्यादी भूषण पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ते आपल्या सावता नगर, उर्दू शाळेसमोर नशिराबाद येथे असलेल्या आरओ-प्लांटवर काम करत होते. त्यावेळी योगेश रविंद्रनाथ नाथ व त्याची पत्नी कविता योगेश नाथ (रा. भवानी पेठ, नशिराबाद) हे दोघे तेथे आले. सदर दाम्पत्याने “तू कोर्टात आमच्याविरुद्ध चेक बाउन्सची केस केली आहे, ती तात्काळ मागे घे” असा दबाव आणला. यास नकार दिल्यावर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली तसेच “केस मागे घेतली नाही तर तुला जीवे ठार मारू” अशी उघड धमकी दिली. या दरम्यान आरोपींनी आरओ प्लांटवरील पाण्याचे जार फेकून नुकसान केले असल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
सदर वाद-विवादाच्या घटनेदरम्यान राकेश अशोक पाटील (रा. वरची आळी, नशिराबाद) व पवन शर्मा (रा. सागर हॉटेलजवळ, नशिराबाद) हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले असल्याचे पोलिसात नोंदविलेल्या फिर्यादीत फिर्यादी तर्फे कळविण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर फिर्यादी भूषण पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात हजर होऊन योगेश रविंद्र नाथ व कविता योगेश नाथ या दाम्पत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दि.२७ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ठीक २ वाजून ६ दरम्यान नशिराबाद पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.प्रशांत विरनारे करीत आहे.

